
मुंबई : कर्जबाजारी झालेल्या एका २८ वर्षांच्या तरुणाने विषारी इंजेक्शनद्वारे आत्महत्येचा प्रयत्नाचा मेल पाठविल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच या तरुणाला ताब्यात घेऊन आत्महत्येपासून परावृत्त केले. या तरुणाची समुपदेशन केल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गुरुवारी ३१ ऑगस्टला एका तरुणाने त्याच्या मेलवरुन तो विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या करत असल्याचा एक मॅसेज पोलीस आयुक्त कार्यालयासह इतर बँक कार्यालय आणि प्रसारमाध्यमांना पाठविला होता. या मॅसेजची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या तरुणाचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना त्याचा मोबाईल बंद येत होता. तसेच तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने त्याचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. तरीही त्याचा शोध सुरूच ठेवून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला विक्रोळीतील कन्नमवार नगर क्रमांक दोन, महात्मा फुले हॉस्पिटलसमोरून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे त्याला कर्जाचे हप्ते भरता येत नव्हते. याच कारणावरुन तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्येचा निर्णय घेतला होता.