
मुंबई : पोलीस ठाण्याच्या आवारात दर्शित रमेशचंद्र साफी या ५६ वर्षांच्या रिक्षाचालकाने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात घडली. दर्शितला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रविवारी रात्री दर्शित हा कांदिवली पोलीस ठाण्यात आला होता. त्याने ठाणे अंमलदाराला मुन्ना नावाच्या एका व्यक्तीला त्याने पावणेदोन लाख रुपये कर्जाने दिले आहे. मात्र मुन्ना हा त्याला त्याचे पैसे परत नाही. त्यामुळे मला न्याय द्या, नाहीतर मी माझ्या जिवाचे बरेवाईक करुन घेईल असे सांगितले. यावेळी ठाणे अंमलदाराने मुन्नाला कॉल करुन पैशांविषयी विचारणा करुन दर्शितला तातडीने पैसे द्यावे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. काही वेळानंतर तो बाहेर आला आणि पुन्हा पोलीस ठाण्यात आला. त्याने तक्रारीसाठी पोलिसांकडे एक कागद मागितला. त्यानंतर तो चक्कर येऊन खाली पडला. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना समजताच त्यांनी त्याला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दर्शितने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासात रिक्षात आलेला दर्शित हा गुजरातच्या अहमदाबाद, किसनपूरच्या सविता पार्कचा रहिवाशी आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी मुन्नाला कर्जाने पावणेदोन लाख रुपये दिले होते. तो पैसे देत नसल्याने तो मानसिक नैराश्यात होता. त्यातून त्याने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र हा गुन्हा असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.