लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाला अटक

अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते
लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाला अटक

मुंबई : प्रेमभंगातून एका तरुणीचा विनयभंग करून तिची सोशल मिडीयावर बदनामीचा प्रयत्न केल्यानंतर लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विकेशनावाच्या एका २२ वर्षांच्या तरुणाला सहार पोलिसांनी वेळीच आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्याचे समुपदेशन करून नंतर त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी तक्रारदार तरुणीने विकेशविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर विकेशविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह अश्‍लील संभाषण करून बदनामी करणे, धमकी देणे या भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी त्याची गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे, एपीआय कोळी, उपनिरीक्षक संजय कल्हाटकर, भूषण जाधव, अंमलदार विशाल जाधव, महेश गायकवाड, रवी पेंढारी, सागर गायकवाड यांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच विकेशने प्रेमभंग झाल्याने आपण रेल्वेखाली आत्महत्या करत असल्याचा एक मॅसेज तक्रारदार तरुणीच्या नातेवाईकांना पाठविला होता. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याचे लोकेशन काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो सीएसएमटी ते दिवा असा लोकलने प्रवास करत असल्याचे दिसून आले. तो दिवा येथे राहत असल्याने सहार पोलिसाचे तीन विशेष पथक विविध ठिकाणी रवाना झाले होते. यावेळी त्याचा शोध घेऊन लोकलखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला उपनिरीक्षक संजय कल्हाटकर, अंमलदार विशाल जाधव आणि महेश गायकवाड यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची माहिती त्याच्या भावासह आई-वडिलांना देण्यात आली होती. त्याचे समुपदेशन करून त्याला नंतर विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत त्याला सोमवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गुन्हा घडल्यानंतर आरोपीनी आत्महत्या करत असल्याचा मॅसेज पाठविताच पोलिसांनी तातडीने कारवाई करून विकेशला दिवा येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर व त्यांच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in