अंधेरीत २१ वर्षांच्या विवाहितेची आत्महत्या ; छळ करणाऱ्या सासूविरुद्ध गुन्हा दाखल

सतत वाद घालून टोमणे मारत असल्याच्या नैराश्यातून संजनाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
अंधेरीत २१ वर्षांच्या विवाहितेची आत्महत्या ; छळ करणाऱ्या सासूविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या संजना रंजित राजभर या २१ वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासू सिंधू शंभू राजभर हिच्याविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सतत वाद घालून टोमणे मारत असल्याच्या नैराश्यातून संजनाने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांत संजनाने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. धीरज रामरूप राजभर हे मूळचे उत्तर प्रदेशच्या जौनपूरचे रहिवासी आहेत. एप्रिल २०२३ रोजी संजनाचा विवाह त्यांच्या नात्यातील रंजित राजभर याच्यासोबत झाला होता. लग्नानंतरही तिचे शिक्षण सुरू असल्यामुळे ती वडिलांसोबत राहत होती. २७ ऑगस्टला ती पतीसोबत सासरी निघून गेली होती. तेव्हापासून ती अंधेरीतील मरोळ पाईपलाईन, इंदिरानगरच्या राजभर चाळीतील रूम क्रमांक ३८ मध्ये राहत होती. तिची सासू घरातील कामांवरून तिच्याशी वाद घालत होती. तिला सतत टोमणे मारत असायची. २८ सप्टेंबरला तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. सासूसोबत होणाऱ्या वादाला आणि तिच्या टोमण्यांना प्रचंड कंटाळून गेल्याचे तिने वडिलांना सांगितले होते. मात्र तिला तिच्या उत्तर प्रदेशातील वडिलांच्या घरी येत नव्हते. याच नैराश्यातून तिने शनिवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

ही माहिती समजताच धीरज राजभर हे मुंबईत आले होते. सासूकडून होणाऱ्या वादासह टोमण्यांना कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी सासू सिंधू राजभर हिच्याविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सासूविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच आरोपी सासू सिंधूची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in