मुंबई : दोन मित्रांवर गंभीर आरोप करून एका ४८ वर्षांच्या रिक्षाचालकाने गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मोहम्मद अजीज गुलाम मोहम्मद शेख असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात त्याने जवळच्या दोन मित्रांवर गंभीर आरोप करून त्यांनीच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर उमेश राठोड आणि गुड्डू या दोन्ही मित्रांविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाचालक मोहम्मद अजीज हा गोरेगाव येथील मोतीलालनगर तीनच्या आझादनगर परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे राममंदिर रेल्वे स्थानकाजवळ आला. काही वेळानंतर त्याने गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलखाली आत्महत्या केली होती. अपघाताची माहिती मिळताच बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांनी पॅनकार्ड, वाहन परवाना आणि एक सुसाइड नोट सापडली होती. या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली होती. ही माहिती नंतर त्याचा भाऊ मोहम्मद शफी याला देण्यात आली. या सुसायट नोटमध्ये त्याने त्याच्या दोन मित्रांवर गंभीर आरोप केला होता. या दोघांनी क्षुल्लक वादातून त्याला मारहाण केली होती.