
मुंबई : बोरिवलीतील एका ब्रोकरने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरुद्ध शीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात सुरेश चक्रे, संतोष मनाला, रवी तळेकर, दिलीप मुरुडकर, अविनाश पवार आणि प्रविण माटे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शैलेश पाटील हे बोरिवली परिसरात राहत होते. त्यांचा ब्रोकरचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका रूमचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यात त्यांची फसवणूक झाली होती. त्यातच पैशावरून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. फसवणुकीसह धमक्यामुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी त्यांच्या राहत्या घरी बोरिक ॲसिड पावडर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांच्या पत्नीच्या लक्षात तिने त्यांना तातडीने कांदिवलील शताब्दी रुग्णालयत दाखल केले. प्रकृती बिघडल्याने नंतर त्यांना पुढील उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली होती. त्यात शैलेश पाटील यांनी सुरेश चक्रे हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता, तर संतोष मनाला, रवी तळेकर, दिलीप मुरुडकर, प्रविण माटे व अविनाश पवार यांनी त्याची रुम खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक केल्याचे नमूद केले होते. हा प्रकार नंतर त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने शीव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.