मुंबई : सांताक्रुझ येथे एका १९ वर्षांच्या सफाई कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर रोहतास कागडा असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
सफाई कामगार म्हणून काम करणारा सागर हा सांताक्रुझ येथील वाकोला, चिरखाननगर, वाल्मिकी वस्तीत राहत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून तो काहीच काम करत नव्हता. आर्थिक चणचणीमुळे त्याने २४ डिसेंबरला सांताक्रुझ येथील कोळे-कल्याण पोलीस मैदानातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र दोरी तुटली आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर तो मानसिक तणावात होता. बुधवारी रात्री उशिरा तो पुन्हा तिथे आला होता. यावेळी त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे पाच वाजता हा प्रकार एका नागरिकाच्या निदर्शनास येताच, त्याने वाकोला पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सागरला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.