अटल सेतूवरून महिला डॉक्टरची आत्महत्या; मृतदेहाचा शोध सुरू

फोटो काढायचा आहे असे सांगून चालकाला टॅक्सी थांबवण्यास भाग पाडले होते.
अटल सेतूवरून महिला डॉक्टरची आत्महत्या;  मृतदेहाचा शोध सुरू

उरण : शिवडी- न्हावा सिलिंक (अटल सेतू) वर रविवारी एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. किंजल शहा असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डॉ. किंजल शहा (४३) या गेल्या दहा वर्षांपासून नैराश्यात होत्या. नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉ. किंजल शहा या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. बाहेर काम आहे, असे सांगून त्या रविवारी घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर एका टॅक्सीमधून अटल सेतूवर येऊन तिने समुद्रात उडी घेतली. फोटो काढायचा आहे असे सांगून त्यांनी चालकाला टॅक्सी थांबवण्यास भाग पाडले होते.

या झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून सदर टॅक्सीचालकाने पोलिसांना तत्काळ माहिती दिली. त्यांच्या पर्समधून सुसाईड नोट देखील सापडली आहे. अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे त्यात लिहिले होते. तसेच, गेल्या आठ वर्षांपासून तीव्र नैराश्यात असल्याचेही नमूद होते असे समजते. सोमवारी संध्याकाळी उशिरा भोईवाडा पोलिसांनी न्हावा-शेवा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची ओळख पटली. पोलीस सदर महिलेच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in