Mumbai : प्रेमीयुगुलाची आत्महत्या, प्रेमसंबंधाला विरोध असल्याने डोंगरावरून उडी घेऊन जीवन संपविले

या दोघांची चांगली मैत्री होती. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र,
Mumbai : प्रेमीयुगुलाची आत्महत्या, प्रेमसंबंधाला विरोध असल्याने डोंगरावरून उडी घेऊन जीवन संपविले

कांदिवली येथे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने तिच्या २१ वर्षांच्या प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने दोघांनी एकत्र राहू शकत नाही तर एकत्र जीवन संपवू टाकू, असा निर्णय घेत डोंगरावरून उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

१५ वर्षांची शबाना (नावात बदल) ही कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, जानूपाडा, आदिवासी गावठाण परिसरात तिच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. ती दहावीत शिकत होती. गेल्या चार महिन्यांपासून ती शाळेत जात नव्हती. याच परिसरात आकाश चंद्रकांत झाटे (२१) हा तरुण राहतो. तो हाऊसकिपिंगचे काम करत होता. या दोघांची चांगली मैत्री होती. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, या दोघांच्या प्रेमसंबंधाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे ते दोघेही मानसिक तणावात होते. यातूनच ते दोघेही गुरुवारी रात्री उशिरा घरातून निघून गेले. सकाळी तिची आई कामावर जाण्यासाठी जेवण बनविण्यासाठी उठली असता तिला शबाना घरी नसल्याचे लक्षात आले. तिने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही.

सकाळी साडेसात वाजता तिने समतानगर पोलिसांत शबानाची मिसिंग तक्रार केली होती. शबाना ही अल्पवयीन असल्याने समतानगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत शबानाचा शोध सुरू केला होता. शोधमोहीम सुरू असताना आदिवासी गावठाण येथून काही अंतरावर असलेल्या भूमी व्हॅली खदानाजवळ शबाना आणि आकाश हे दोघेही जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या दोघांनाही तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात शबाना आणि आकाश या दोघांनी तेथील डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीयांची पोलिसांनी जबानी नोंदवून अपमृत्यूची नोंद केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in