कर्जत : कर्जत शहरातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला शिकणाऱ्या हर्षल महाले या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. हॉस्टेलमध्ये त्याचे सहकारी विद्यार्थी त्याचा छळ करत असल्याचे उघड झाले आहे.
आत्महत्या केलेल्या हर्षलच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे यासोबतच अन्य कलमे लावली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून अजूनपर्यंत कोणालाही अटक झाली नाही.
हर्षल महाले या विद्यार्थ्याने सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून १ डिसेंबर रोजी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. काही दिवसांनंतर हर्षलच्या पालकांना सुसाइड नोट व त्याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सुसाइड नोटमध्ये हर्षलने लिहिले होते की, माझ्या रूममधील सहकाऱ्यांकडून मानसिकरीत्या छळ केला जात असून त्यांच्याविरोधात कारवाई केली जावी.