
मुंबई : पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर पतीवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा भांडुपमध्ये दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे दाम्पत्य भांडुपमधील टेंबीपाडा परिसरात राहत होते. प्राथमिक तक्रारीनुसार त्यांना मूल होऊ न शकल्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. भांडुप पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव शीतल खानविलकर असे आहे. २९ डिसेंबर रोजी तिने टेंबीपाडा येथील द्रौपदी निवास येथे घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या पतीच्या भावाने शीतलच्या भावाला - उदय खोत यांना या घटनेची माहिती देतानाच तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. उदय तेव्हा कोलकात्यात होते. त्यांनी मामाला घटनास्थळी जाण्यास सांगितले.
उदय कोलकात्यावरून परत आल्यानंतर त्यांनी बहिणीला झालेल्या छळाबाबत पोलिसांना अधिक माहिती दिली. यामुळे पोलिसांनी शीतलच्या पती महेश खानविलकर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
उदयने पोलिसांना सांगितले की, पहिले लग्न मोडल्यानंतर महेशने शीतलबरोबर लग्न केले. मात्र, लग्नाच्या सुरुवातीपासूनच दोघांना मुल नसल्यामुळे समस्या निर्माण झाल्या. आयव्हीएफ उपचार करूनही मूल होऊ शकले नाही. यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. कुटुंबीयांच्या हस्तक्षेपानंतर जोडपे भांडुपमध्ये राहायला आले. सुरुवातीच्या काही महिन्यानंतर महेशला दारूचे व्यसन लागले. त्याने शीतलला वारंवार मारहाण केली तसेच तिचा छळ सुरू
केला. उदयने दावा केला की, सततच्या छळामुळेच बहिणीने आत्महत्या केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून आत्महत्येचा तपास सुरू केला आहे.