मुसळधार पावसातही पश्चिम रेल्वे विनाअडथळा धावणार ; मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांची 'दै. नवशक्ति'ला मुलाखत

पश्चिम रेल्वे मार्गावर यंदा ताशी ७० मिमी पावसाची नोंद झाली, तरी पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत होणार नसल्याची शाश्वती दिली.
मुसळधार पावसातही पश्चिम रेल्वे विनाअडथळा धावणार ; मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांची 'दै. नवशक्ति'ला मुलाखत
VGP

पावसाळ्याच्या दिवसात उपनगरीय रेल्वे मार्गावरील बहुतांश ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचणे, पूर परिस्थिती निर्माण होते. यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसतो; मात्र यंदाच्या पावसाळ्यात विनाअडथळा रेल्वे प्रवास, पावसाळ्यातील तांत्रिक खोळंबा टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. मार्च महिन्यापासून मान्सूनपूर्व कामांना गती देण्यात आली असून, यंदा ताशी ७० मिमी पावसाची नोंद झाली, तरी पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत होणार नसल्याची शाश्वती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दै. नवशक्तिला दिली. याचवेळी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सद्यस्थितीत सहा वातानुकूलित लोकल असून दररोज ७९ फेऱ्या होतात. अद्याप आणखी एसी लोकल वाढवण्याचा कोणताही विचार नसून सध्या सुरू असणाऱ्या सेवांच्या वेळेत, वेगात सुधारणा करण्याकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

कधीही न थांबणारी मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल सेवा पावसाळ्याच्या दिवसात अनेकवेळेस विस्कळीत होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रेल्वे रुळांमध्ये साचणे, ओव्हरहेड वायरींमध्ये बिघाड, नाल्यातून कचरा सर्वत्र पसरणे, रेल्वे मार्गांच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या रेल्वेवर पडणे या सर्व घटनांमुळे रेल्वे बऱ्याचदा ठप्प होते. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. पश्चिम रेल्वे मात्र यामध्ये उजवी ठरली आहे. गेल्या २ वर्षात पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात बिघाड अथवा सेवा विस्कळीत होण्याच्या कोणत्याही घटना पश्चिम रेल्वेवर घडलेल्या नाहीत. यंदा देखील पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने मार्च महिन्यापासूनच मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत तर दुसऱ्या टप्य्यात ३० मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

या मान्सूनपूर्व कामांमध्ये येणाऱ्या पावसाळ्याचा दृष्टीने नालेसफाई, रेल्वे रुळांची दुरुस्ती देखभाल, गटारांची स्वच्छता करण्यात येत असून पाणी तुंबण्याची १० महत्त्वाची स्थळे शोधत त्याठिकाणी मायक्रोट्नेल, पंप बसवण्यात येत आहेत. नालेसफाई, कल्व्हर्ट, ड्रेनेजसारख्या कामांवर भर देण्यात आला आहे. यामध्ये, प्रभादेवी-दादर, वसई- विरार, बोरिवली- गोरेगाव या स्थानकांचा समावेश आहे. दरम्यान, पावसाळ्यातील नेमके अडथळे कोणते? त्यामागची कारणे, उपाययोजना आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवास कसा होईल याबाबत सविस्तर चर्चा करत कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि जबाबदारी वाटून घेत काम पार पाडले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

नव्या एसी लोकल दाखल करण्याचा तूर्तास विचार नाही

५ मे २०२२ पासून एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेवरील सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. वाढत प्रतिसाद पाहता आणखी फेऱ्यामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी आणखी काही एसी लोकलची गरज आहे. परंतु ते आमच्या हातात नसून जसा पुरवठा होईल त्यानुसार एसी लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल. तूर्तास एसी लोकलची संख्या वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे सुमित ठकार यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. एमआरव्हीसी एमयूटीपी ३ आणि ३ ए अंतर्गत पश्चिम रेल्वेला तब्बल २०० एसी लोकल उपलब्ध होणार आहेत. मात्र या लोकल टप्प्याटप्याने ताफ्यात येणार असून त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो असे देखील ठाकूर यांनी सांगितले.

पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामात अनेक अडचणी

मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका उभारून मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेने घेतला. यामुळे या पट्टय़ातून जाताना अप, डाऊन जलद लोकल गाडय़ांचेही वेळापत्रक सुरळीत होणार आहे. यासाठी २००८-०९ साली मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचव्या, सहाव्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली. या मार्गिकेसाठी ९१८ कोटी ५३ लाख रुपये तरतूद करण्यात आली. सद्यस्थितीत मुंबई सेंट्रल ते दादपर्यंतही कामे पूर्ण झाली असून, दादर ते सांताक्रूझपर्यंत पाचव्या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही सर्व कामे झटकन पूर्ण होण्यासारखी नाहीत. खूप मोठा प्रकल्प असल्याने त्यासाठी सर्व गोष्टी जुळून येणे पण तितकेच आवश्यक असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. पाचव्या,सहाव्या मार्गिकेच्या कामामध्ये अनेक लहानमोठ्या अडचणी येत आहेत. वांद्रे, खार, सांताक्रूझ येथे या मार्गिकेच्या जागेवर अतिक्रमणे आहेत. वांद्रे येथे दफनभूमी असून ती स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम काहीठिकाणी गोगलगाय गतीने होत असून, लवकरच ही मार्गिका प्रवाशांना मोठी कनेक्टीव्हीटी देईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

या सुविधांकडे अधिक लक्ष देणार

  • रेल यात्री अँपमधील तांत्रिक अडचणी सुधारणा.

  • रेल्वे सेवा गतिशीलता, सुरक्षितता.

  • वेग वाढवण्यासाठी महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळ, पॉइंट्सशी संबंधित ऑपरेशनल अडचणी दूर करणार.

  • सिग्नल पासिंग घटना थांबल्या असून, रेल्वे रुळांमधील आत्महत्या, अपघात थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in