रविवार १९ जून रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता असून, काही लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिराने धावणार आहेत. ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गावर सकाळी ९ दुपारी १ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या विभागामध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. तर ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळमार्गे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम :
ब्लॉकमुळे ११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, १७६११ हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस, १२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, १३२०१ पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, १७२२१ काकीनाडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, २२१६० चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस, १२१६८ बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस, १२३२१ हावडा-मुंबई मेल (प्रयागराज मार्गे), १२८१२ हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ११०१४ कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. परिणामी या गाड्या निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिरा पोहोचतील. याशिवाय ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस आणि ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या कल्याण येथे १०-१५ मिनिटे उशिराने पोहोचतील. १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस ठाणे आणि दिवादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा १०-१५ मिनिटे उशिरा धावेल.