कथित खिचडी घोटाळा प्रकरण : सूरज चव्हाण यांची ईडी कारवाईविरोधात याचिका

ईडीने याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी याचिकेची सुनावणी १२ फेब्रुवारीला निश्‍चित केली.
कथित खिचडी घोटाळा प्रकरण : सूरज चव्हाण यांची ईडी कारवाईविरोधात याचिका

मुंबई : कथित खिचडी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेला आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी ईडीची अटकेची कारवाई आणि ईडीच्या रिमांड अर्जाला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. ईडीने याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितल्याने न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी याचिकेची सुनावणी १२ फेब्रुवारीला निश्‍चित केली.

कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. अमोल कीर्तीकर यांच्या खात्यात ५२ लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याचे उघड झाल्यानंतर ईडीकडून सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची ईडी कोठडीत रवानगी केली होती. ती मुदत सोमवारी संपल्याने नंतर रिमांड अर्ज दाखल केला. त्याची दखल घेत सूरज चव्हाण यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली.

ईडीची कारवाई आणि रिमांड अर्जाविरोधात चव्हाण यांच्या वतीने अ‍ॅड. हर्शद भडभडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी ईडीच्या वतीने याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने दोन आठवड्यांचा वेळ देत याचिकेची सुनावणी १२ फेब्रुवारीला निश्‍चित केली.

logo
marathi.freepressjournal.in