नूतनीकरणाच्या नावाखाली शस्त्रक्रिया रखडल्या; BMC च्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील प्रकार, महिला रुग्णांचे हाल

सांताक्रुज येथील मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
नूतनीकरणाच्या नावाखाली शस्त्रक्रिया रखडल्या; BMC च्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील प्रकार, महिला रुग्णांचे हाल
Published on

मुंबई : सांताक्रुज येथील मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. यामध्ये महिला रुग्णांची संख्या अधिक आहे. तर तीन महिन्यांपासून रुग्णालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांवरील शस्त्रक्रियागृह बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत, तर काही तातडीच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अन्य रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत आहे.

महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामाला तीन महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली. तिसऱ्या मजल्यावर मज्जातंतू विभाग आणि अस्थिव्यंग विभागाचे शस्त्रक्रियागृह, तसेच दुसऱ्या मजल्यावर नेत्र विभाग, कान, नाक, घसा विभागाचे शस्त्रक्रियागृह आहे. तीन महिन्यांपूर्वी नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यापासून हे शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. शस्त्रक्रियागृह बंद असल्याने रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. त्यामुळे, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. तर काही रुग्णांवर उपचार करण्यात येत असले तरी शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला महिनाभर थांबावे लागणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

तपासणीची प्रक्रिया सुरुवातीपासून

काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पालिकेच्या केईएम, कूपर, नायर या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येत आहे. अन्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवलेल्या रुग्णांना तपासणीची प्रक्रिया सुरुवातीपासून करावी लागत आहे. यामुळे वेळ व पैसा वाया जात असल्याचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे.

रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागाचे काम पूर्ण झाले असून लवकरच ते सुरू करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

- डॉ. जयराज आचार्य, वैद्यकीय अधीक्षक

व्ही. एन. देसाई रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरू असून ते किती पूर्ण झाले याची मला माहिती नाही. तसेच रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या उपचाराबाबत काय निर्णय घेत आहेत किंवा काय उपचार होत आहेत, याची मला माहिती नाही. रुग्णालय प्रशासन त्याबाबत स्पष्टता करू शकेल.

- संजय कुऱ्हाडे, उपायुक्त, आरोग्य

logo
marathi.freepressjournal.in