मुंबई काँग्रेसच्या २३ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची कारवाई

मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला
File Photo
File Photo

प्रतिनिधी/मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या मुंबईतील २३ पदाधिकाऱ्यांवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सोमवारी निलंबनाची कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये दक्षिण मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद मांद्रेकर, माजी नगरसेविका सुशीबेन शहा, सुनील नरसाळे, रामबच्चन मुरारी, हंसा मारू, अनिता यादव, दक्षिण मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश राऊत आणि ॲड. त्र्यंबक तिवारी यांचा समावेश आहे.

मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या दक्षिण मुंबईतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई कऱण्यात आली. ही कारवाई करताना वर्षा गायकवाड यांनी तातडीने दक्षिण मुंबई जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी पदाची अपेक्षा न ठेवता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने पक्षासाठी काम करू, अशी ग्वाही दिली.

मुंबई विभागीय काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार अमीन पटेल, ज्येष्ठ नेते भवरसिंह राजपुरोहित, महापालिकेतील माजी विरोधी पक्षेनेते ज्ञानराज निकम, किशन जाधव, अश्फाक सिद्दीकी, पूरन दोशी आदी नेते उपस्थित होते. आम्ही कायम काँग्रेससोबतच आहोत आणि कायम राहू. जे गेले त्यांच्यामुळे पक्षाची ताकद अजिबात कमी होणार नाही. आम्ही जोमाने पक्षवाढीसाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करू, अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पक्ष आणि विचारधारा यांच्याशी प्रामाणिक राहून काम करणारे लोक यशस्वी होतात. दुर्दैवाने मिलिंद देवरा यांनी पक्षाशी आणि विचारधारेशीही फारकत घेतली. पण एक व्यक्ती सोडून गेल्याने ना पक्ष खिळखिळा होत ना विचारधारा कमकुवत होत उलट त्यामुळे मला आणि असंख्य कार्यकर्त्यांना काम करायला बळ मिळालं आहे, असे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in