
मुंबई : विवाहबाह्य संबंधाच्या संशयतून दहा वर्षांपूर्वी झालेला वादात पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या महिलेला न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा देण्यास नकार दिला. दोघांमध्ये झालेल्या भांडणात पतीला प्राण गमवावा लागला, असे निरीक्षण नोंदवत आरोपी महिला जन्नतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले.
पोस्टमॉर्टम दरम्यानही डॉक्टरांना युसूफच्या शरीरावर ३७ जखमा दिसल्या होत्या. त्या आधारे आरोपी जन्नतला हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्याची विनंती फिर्यादी पक्षाने केली. मात्र आरोपीचा युसूफला मारण्याचा हेतू होता हे फिर्यादी पक्ष सिद्ध करू शकला नाही. पती-पत्नीत अचानक झालेल्या भांडणातून आरोपी जन्नतने रागाच्या भरात हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे, असे मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी नोंदवले आणि आरोपी जन्नत अन्सारीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
मुलांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण
जोगेश्वरी पूर्वेकडील नागप्पा यलप्पा चाळीत राहणाऱ्या जन्नत अन्सारी हिचे ११ सप्टेंबर २०१५ च्या मध्यरात्री पतीशी कडाक्याचे भांडण झाले. जन्नतला पती युसूफचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. घटना घडली, त्यादिवशी त्यांच्या वादाचे पर्यवसान थेट पतीचा जीव घेण्याइतपत पोचले. भांडणानंतर जन्नतने स्वयंपाकघरातील चाकूने युसूफवर अनेक वार केले. त्यात युसूफला प्राण गमवावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी जन्नतला अटक करून खटला दाखल केला. या खटल्याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी युसूफच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी जन्नतनेच युसूफची हत्या केल्याची न्यायालयात साक्ष दिली.