मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये बाऊंसर म्हणून काम करणार्या फरजाना अस्लम खान या महिलेवर तिच्याच परिचित तडीपार गुन्हेगाराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या अजहर अख्तर हुसैन खान ऊर्फ आरिफ याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. अजहर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई करण्यात आली होती.
फरजाना ही तिच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील संतोषनगरात राहत असून ती फिल्मसिटीमध्ये बाऊंसर म्हणून काम करते. याच परिसरात आरिफ हा राहत असून तो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत क्षुल्लक कारणावरुन वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी तिच्यासह तिच्या पतीचे आरिफसोबत वाद झाला होता. यावेळी त्यांनी आरिफविरुद्ध आरे पोलिसांत तक्रार केली होती. आरिफविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर पोलिसांकडून तडीपारची कारवाई करण्यात आली होती.
ही कारवाई सुरु असतानाच सोमवारी १८ सप्टेंबरला तो गोरेगाव परिसरात आला होता. यावेळी त्याने मागील वादाच्या रागातून तुला आज जिवंत सोडत नाही अशी धमकी देत तिच्यावर लोखंडी पाईपवर हल्ला केला होता. यावेळी तिच्या मदतीसाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांनाही त्याने जिवे मारण्याची धमकी देत मध्यस्थी करु नका नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगितले होते. त्यामुळे ती घाबरुन तिच्या घरी गेली आणि लपून बसली होती. तिला शिवीगाळ केल्यानंतर काही वेळानंतर आरिफ तेथून निघून गेला. हल्ल्यात फरजाना ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तिच्या आईसह बहिणीने तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार करण्यात आले होते.
उपचारानंतर तिने घडलेला प्रकार दिडोंशी पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरिफविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरिफला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.