स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; मुंबईकरांच्या चिंतेत भर

कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा चढ-उतार पाहता सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेचा उद्रेक होणार, असे संकेत मिळत आहेत
स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ;  मुंबईकरांच्या चिंतेत भर

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईला विळखा बसला आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत तर आठवडाभरात दुपटीने वाढ झाली असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ आरोग्य विभागासह मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा चढ-उतार पाहता सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाटेचा उद्रेक होणार, असे संकेत मिळत आहेत. चौथ्या लाटेचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी मुंबई महापालिका उपाययोजना करत असताना आता साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये स्वाईन फ्लूचा झपाट्याने फैलाव होत असून, आठवडाभरात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. १ ते ७ ऑगस्टदरम्यान स्वाईन फ्लूच्या ८० रुग्णांची नोंद झाली होती; मात्र ८ ते १४ ऑगस्ट या आठ दिवसांत स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत ४२ने वाढ झाली असून, रुग्णसंख्या १३८वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ मलेरियाचे ४१२, डेंग्यूचे ७३, लेप्टोचे २९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in