मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला; सात दिवसांत ५१ नवे रुग्ण

गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याने आता पावसाळी आजारांच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला; सात दिवसांत ५१ नवे रुग्ण

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढला आहे. १८ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूचे ११ रुग्ण होते; मात्र सात दिवसांत रुग्णसंख्येत ५१ने वाढ झाल्याने स्वाईन फ्ल्यूचे शहरात ६२ रुग्ण झाले आहेत. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याने आता पावसाळी आजारांच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ठाण्यात पाय पसरणाऱ्या स्वाईन फ्ल्यूचे आता मुंबईत संकट गडद होत आहे. १ ते १८ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूचे ११ रुग्ण होते; मात्र स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत ५१ने वाढ झाल्याने मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, ठाण्यातील दोन महिलांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

गरोदर महिला, ज्येष्ठांनी

काळजी घ्यावी!

स्वाईन फ्ल्यूचा फैलाव झपाट्याने होत असून गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह रुग्ण आदींना ताप, सर्दी, खोकला असेल त्यांनी जवळील दवाखान्यात किंवा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे. दरम्यान, हात स्वच्छ धुवावेत, गर्दीत जाणे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in