तबेला ते फाइव्ह स्टार, नायर रुग्णालयाचा प्रवास; ९० वर्षे पूर्ण, तळ अधिक ११ मजली अद्ययावत दंत रुग्णालय सेवेत

१९३३ साली छोट्याशा तबेल्यात दंत रुग्णालय सुरू करण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालयाला ९० वर्षें पूर्ण झाले असून या ९० वर्षांत अनेक तज्ज्ञ डॉक्टर निर्माण केले.
तबेला ते फाइव्ह स्टार, नायर रुग्णालयाचा प्रवास; ९० वर्षे पूर्ण, तळ अधिक ११ मजली अद्ययावत दंत रुग्णालय सेवेत

मुंबई : १९३३ साली छोट्याशा तबेल्यात दंत रुग्णालय सुरू करण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालयाला ९० वर्षें पूर्ण झाले असून या ९० वर्षांत अनेक तज्ज्ञ डॉक्टर निर्माण केले. आज नायर रुग्णालयाची दंत रुग्णालय स्वतंत्र रुग्णालय एक फाइव्ह स्टार रुग्णालय झाले असून तळ अधिक ११ मजली इमारतीत अद्ययावत ऑपरेशन थिएटर, वातानुकूलित जनरल वॉर्ड, लेझर सर्जरी, रोज ८०० रुग्णांची तपासणी, अशी अद्ययावत सुविधा आताच्या दंत रुग्णालयात उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ नीलम अंद्राडे यांनी दिली.

पालिकेच्या नायर दंत रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. १९३३ मध्ये सुरू झालेल्या नायर रुग्णालयाच्या घोडदौडीला यावेळी उजाळा देण्यात आला. सुरुवातीच्या काळात जनरल रुग्णालय सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णालयाचा विस्तार झाला. या ठिकाणी एक वेळ तबेलाही होता. हा तबेला हटवून या ठिकाणी दंत उपचार विभाग सुरू करण्यात आला. यानंतर रुग्णालयांत प्रचंड सुधारणा होत जाऊन आता दंत महाविद्यालयाची स्वतंत्र ११ मजली इमारत उभी राहिल्याचे त्या म्हणाल्या.

नायर दंत रुग्णालयात दर दिवसाला ७०० ते १००० रुग्णांची ओपीडी असते. त्यातील अनेकांना महागड्या शस्त्रक्रिया लागतात. त्या देखील मोफत केल्या जाणार आहेत. दरवर्षी ३ लाख रुग्णांवर उपचार केले जातात. आता हे प्रमाण आणखी वाढणार. दोन विशेष वॉर्ड, संसर्ग विरहित ३ विशेष रूम, ६ खासगी वॉर्ड अशा सुविधाही असतील. या इमारतीच्या बांधकामासाठी १५० कोटींहून अधिक खर्च आला आहे. सर्व अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सज्ज असे वॉर्ड आहेत. ३ अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची सुविधा करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, नायर अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, शीव डीन डॉ. मोहन जोशी, केईएम डीन डॉ. संगीता रावत आदी उपस्थित होते.

अशा आहेत सुविधा

-या ११ मजली अद्ययावत इमारतीत शिकाऊ डॉक्टरांसाठी मोठे क्लास रूम्स, वातानुकूलित सेमिनार हॉल, रुग्णांसाठी वॉर्ड, मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह तयार करण्यात आले आहे.

-आठव्या मजल्यावर असणाऱ्‍या वसतिगृहात इथल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे, तर ५ व्या मजल्यापर्यंत संपूर्ण रुग्णसेवेसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहेत.

- इमारतीत काही महत्त्वाच्या विभागाच्या मोठमोठ्या आणि मॉड्युलर अत्याधुनिक मशीन उपलब्ध झाल्या आहेत. सोबत, विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मोठे क्लास रूम्स, वातानुकूलित सेमिनार हॉल, रुग्णांसाठी वॉर्ड, मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह देखील सुरू करण्यात आले आहेत. फक्त आठव्या मजल्यावर असणाऱ्या वसतिगृहात २५० निवासी डॉक्टरांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवेश क्षमता १०० होणार

दंत महाविद्यालयाची क्षमता सध्या ७५ विद्यार्थी इतकी आहे, तर नवी इमारत अद्ययावत सुविधा, २५० विद्यार्थी क्षमतेचे विद्यार्थी वसतिगृह यामुळे या ठिकाणी लवकरच विद्यार्थ्यांची क्षमता १०० होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in