राणाच्या चौकशीतून काय बाहेर येईल?

अजमल कसाबच्या चौकशीतून जी माहिती हाती आली त्यापेक्षा कैक पटीने आणि अधिक सखोल माहिती राणाच्या चौकशीतून उघड होऊ शकते. याचे कारण कसाब हा प्रत्यक्ष हल्लेखोर होता, तर राणा हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे.
राणाच्या चौकशीतून काय बाहेर येईल?
Published on

- रवींद्र राऊळ

मुंबईवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याला भारतात आणणे हे भारत सरकारचे मोठे राजनैतिक आणि कायदेशीर यश आहे. त्याला भारताच्या भूमीत यावे लागले आणि पुढील पर्वाला आता सुरुवात झाली आहे.

पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वूर राणा याने आयएसआयच्या सहकार्याने २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याची योजना आखत डेव्हिड कोलमन हेडलीचा भारतातील प्रवास सुलभ केला होता. हल्ल्यापूर्वी त्याने अनेकदा मुंबईची रेकी केली होती. त्याच्या चौकशीतून हल्ल्याच्या कटाबद्दल आणि त्यात इस्लामाबादच्या भूमिकेबद्दल नवीन माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबईवरील हल्ला हा भारतातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक होता, ज्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीत अनेक ठिकाणी हल्ले केले होते. हल्ल्यानंतर पुढच्या वर्षी तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली आणि २०११ मध्ये त्याला १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. भारत सरकार बऱ्याच काळापासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होते. राणाने आपल्या भारत प्रत्यार्पणाविरुद्ध अमेरिकन न्यायालयांमध्ये केलेले अपील फेटाळल्यानंतर, त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदी यच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणा याला भारतात पाठवण्याची घोषणा केली होती. मुंबई हल्ल्यानंतर १७ वर्षांनी का होईना तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण पाकिस्तानसाठी चिंताजनक आहे हे खरे आहे.

तो कॅनेडियन नागरिक आहे आणि गेल्या २० वर्षांपासून त्याने त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही, अशी सारवासारव करत पाकिस्तानने स्वत:ला राणापासून दूर ठेवले आहे. अर्थात, राणाची चौकशी प्रामुख्याने मुंबई हल्ल्यातील इस्लामाबादचा सहभाग, पाकिस्तानी सत्ताधारी मंडळींशी असलेले त्याचे संपर्क, आयएसआय नेटवर्क, लष्करला मिळणारा निधी आणि भारतातील त्याच्या कारवाया यावर केंद्रित असण्याची अपेक्षा आहे.

अजमल कसाबच्या चौकशीतून जी माहिती हाती आली त्यापेक्षा कैक पटीने आणि अधिक सखोल माहिती राणाच्या चौकशीतून उघड होऊ शकते. याचे कारण कसाब हा प्रत्यक्ष हल्लेखोर होता, तर राणा हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. राणावर भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत हत्या, भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणे आणि दहशतवादी कृत्यांचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याला सर्वात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. मुंबई हल्ल्यात पाकिस्तानस्थित तळांवरून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांची आणि त्यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांची भूमिका अधिक स्पष्टपणे समोर येईल. ही चौकशी आणि कृती दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे संपूर्ण जगासाठी एक उदाहरण ठेवू शकते. यासोबतच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आणि इतर बळींना न्याय मिळण्याची आणखी एक आशा अधिक बळकट झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in