
मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील धुळ कमी करण्यासाठी आपली योजना १५ दिवसांत लागू करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला दिले आहेत. बीएमसीने धूळ नियंत्रणासाठी मातीचा थर काढण्याची योजना तयार केली आहे, पण ती अजून लागू केलेली नाही. जर १५ दिवसांच्या आत, स्थानिक प्रशासनाने काही उपाय केले नाहीत, तर एमपीसीबी योग्य ती कार्यवाही करेल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितले.
शिवाजी पार्क येथील सौदर्यीकरणाचा प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी जमिनीची समानता साधण्यासाठी जाड लाल मातीचा थर टाकला गेला होता, बीएमसी आता त्या थरापैकी ९ इंचाचा थर काढण्याची योजना करत आहे. जी-नॉर्थ वॉर्डने भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या अभ्यास अहवालावर आधारित बीएमसी आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. कदम यांनी आयआयटीसह इतर संस्थांकडून सल्ला घेण्यास मंडळाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. शिवाजी पार्कमधील धूळ प्रदूषण एक दीर्घकालीन समस्या आहे, असे कदम म्हणाले.
शिवाजी पार्कचे रहिवासी अनेक वर्षांपासून धुळीच्या प्रदूषणाबद्दल तक्रार करत आहेत. गेल्या महिन्यात मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट झाल्यामुळे ही समस्या प्रकाशात आली आहे.