पावसाळ्यातील प्रवाशांचे त्रास दूर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिका आयुक्तांना निर्देश

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात पुढील चार दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
पावसाळ्यातील प्रवाशांचे त्रास दूर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिका आयुक्तांना निर्देश
Published on

पावसाळ्यात मुंबई उपनगरीय रेल्वे ठप्प झाली म्हणजे मुंबई तुंबली असे चित्र पहावयास मिळते. मुंबईत २५ ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी जमा होण्याची शक्यता लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी २५ रेल्वे स्थानकाबाहेर बेस्ट बस, एसटी गाड्यांची व्यवस्था करा असे निर्देश नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना मंगळवारी दिले. पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास शिंदे यांनी भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात पुढील चार दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवार रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने मंगळवारी मुंबईला झोडपून काढले. दरवर्षी हिंदमाता परिसर जलमय होतो. मात्र यंदा पाण्याचा निचरा वेळीच झाल्याने परिसरातील लोकांना व वाहनचालकांना दिलासा मिळाला. मुंबई महापालिकेने केलेल्या कामामुळे हिंदमाता परिसर पूरमुक्त झाल्याचे सांगत शिंदे यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले.

मुंबई, ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, अमरावती, सांगली या भागात यलो व 'रेड अलर्ट' जारी करण्यात आले आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील चार दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पालक सचिवांनी जातीने लक्ष द्यावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच एनडीआरएफ, नेव्हीचे पथक तैनात ठेवले असून वेळीच गरज मिळावी म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सी वन म्हणजे अतिधोकादायक इमारत राहणाऱ्या रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतर होण्याची सूचना करण्यात येते. ट्रांझिट कॅम्प मध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात येते. आर्थिक नुकसानापेक्षा जीव महत्वाचा असून अतिधोकादायक इमारत राहणाऱ्या रहिवाशांनी मुंबई महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in