विठ्ठला सांभाळून घे रे! अजितदादा गटाने मागितले शरद पवारांचे ‘आशीर्वाद’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली
विठ्ठला सांभाळून घे रे! अजितदादा गटाने मागितले शरद पवारांचे ‘आशीर्वाद’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत सरकारमध्ये सामील झालेले तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार आणि नऊ कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यांचे पाया पडून आशीर्वादही घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहील, याबाबत आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा, अशी विनंती या सर्वांनी शरद पवार यांना केली. यावेळी विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असे म्हणत छगन भुजबळ यांनी पवारांचे पाय धरले. मात्र त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तसेच धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांचा समावेश होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. रविवारी शरद पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होते. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी संबंधितांमध्ये चर्चाही झाली.

या भेटीनंतर पत्रकारांना माहिती देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शरद पवार हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांची भेट घेतली. ते या ठिकाणी असल्याचे समजल्यानंतर त्यांची वेळ न घेता आम्ही सर्व त्यांना भेटलो. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहील, याबाबत आम्हाला मार्गदर्शन करा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. मात्र शरद पवार यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

अजित पवार गटातील मंत्र्यांनी रविवारी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी जवळपास एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केले नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीनंतर शरद पवार काय निर्णय घेणार, हे येत्या काळातच समजणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in