
वाघाचे फोटो काढले म्हणजे वाघ होता येत नाही, देशात सध्या एकच वाघ आहे आणि तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यामुळे सारखं सारखं वाघ म्हणवून घेऊ नका, असा टोला हाणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणल्याशिवाय मी राहणार नाही. मुंबईत लंकादहन होणारच आणि महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बीकेसीत सभा घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय मेळाव्यात फडणवीस यांनी केवळ शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले. यावेळी वाघ भोळाच असतो, या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, ‘‘वाघ भोळचा असतो, तसे बाळासाहेब ठाकरे भोळे होते; पण धूर्त कोण असतं, हे तुम्हाला माहीत आहे. मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही. कारण त्यांनी पातळी सोडली म्हणून मला पातळी सोडायची नाही. ‘‘तुम्ही कुठल्या आंदोलनात गेला होतात, असा सवाल करून कोविडच्या काळातही तुम्ही केवळ फेसबुकवर होतात; पण आम्ही अलाईव्ह होतो, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
शिवसेनेने भाजपच्या नावावर मते मागितली. आणि संसार आमच्याशी केला. संपत्ती घेऊन घटस्फोट न घेता ते पळून गेले.’’अशी टिका करताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी काल भाषणात शिवसेनेचं हिंदुत्व भाजपसोबत असताना गधाधारी होते असे सांगितले. तो धागा पकडून फडणवीस म्हणाले, ‘‘तुमचे हिंदुत्व गधाधारीच आहे, गदाधारी नाहीये. तुम्ही आम्हाला लाथ मारलीत, लाथ गाढवच मारते, असे ते म्हणाले. शिवसेनेकडे काही बोलण्यासारखे नसले की मुंबईला वेगळे करायचे आहे, असा मुद्दा शिवसेना उपस्थित करते असे सांगून फडणवीस यांनी ‘‘कुणाच्या बापाची हिंमत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायची,’’ असे म्हटले. ‘‘आम्हाला मुंबई वेगळी करायची आहे पण ती तुमच्या भ्रष्टाचारापासून, अत्याचारापासून असे सांगत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.