मोबाईलवर बोलणे महागात पडेल! एसटी चालकांना महामंडळाचा निलंबनाचा इशारा; अपघात टाळण्यासाठी निर्णय

संबंधीत चालकावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.
मोबाईलवर बोलणे महागात पडेल! एसटी चालकांना महामंडळाचा निलंबनाचा इशारा; अपघात टाळण्यासाठी निर्णय

मुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सुरक्षित इच्छीत स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीचे चालक पार पाडतात. मात्र काही चालक गाडी चालवताना मोबाईल वर बोलणं, हेड फोन कानात घालून गाणी ऐकणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी यापुढे एसटी चालवताना मोबाईल वर बोलताना, हेड फोन लावून गाणी ऐकताना निदर्शनास आले तर संबंधित चालकाला थेट निलंबित करण्यात येईल, असा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार गाड्या असून ६० इलेक्ट्रिक गाड्या आहेत. या गाड्याच्या माध्यमातून दररोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एसटीच्या गाड्यांना पसंती देतात. मात्र गाडी चालवताना काही चालक मोबाईल वर बोलणं हेड फोन लावून गाणी ऐकतात, समाज माध्यमांतून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एसटी बस चालवत असताना मोबाईल वर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे, बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांत एसटी बस चालवताना मोबाईल वर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. त्यामुळे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in