तानाजी सावंत यांचे पुनर्वसन? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत घेतली भेट

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने माजी मंत्री तानाजी सावंत यांनी नाराजीचा सूर आळवला होता. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईत बोलवले. तानाजी सावंत शनिवारी मुंबईत आले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
तानाजी सावंत यांचे पुनर्वसन? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत घेतली भेट
Published on

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने माजी मंत्री तानाजी सावंत यांनी नाराजीचा सूर आळवला होता. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईत बोलवले. तानाजी सावंत शनिवारी मुंबईत आले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. त्यामुळे तानाजी सावंत यांचे राजकीय पुनर्वसन होणार, मंत्रिमंडळात वर्णी लागणार या मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीत परंडा तालुक्यातून तानाजी सावंत हे विजयी झाले होते. मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा होती. मात्र सावंत यांची मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने तेव्हापासून ते नाराज होते, तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात त्यांचे बंधू आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी शिंदे सेनेला रामराम ठोकला होता. त्यामुळे सावंत कुटुंबीय शिंदे सेनेवर नाराज असल्याचे बोलले जात होते. शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यातच आता शिंदे यांनी सावंत यांना निरोप पाठवत तातडीने मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे सावंत यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे शिंदे सेना आता डॅमेज कंट्रोल करत असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय आणि विविध विषयांवर चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरू आहेत. माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तानाजी सावंत सक्रिय झाले आहेत. शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा निरोप दिला. सावंत यांनी मग मुंबईत येत शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये राजकीय आणि विविध विषयांवर दोन तास चर्चा झाली. सावंत यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याविषयी पोस्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in