मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तानसा तलाव बुधवारी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी 'विहार' तलाव ७ जुलै २०२६ च्या रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्या पाठोपाठ लगेचच त्याच दिवशी म्हणजे ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी 'तुळशी' तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता. तर बुधवारी सकाळी तानसा तलाव ओसांडून वाहू लागला आहे. त्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी बुधवारी २२ जुलै २०२६ पर्यंत तीन तलाव ओसांडून वाहू लागले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचत तानसा धरण असून हे दगडी बांधकाम असलेल्या देशातील मोजक्या धरणांपैकी एक आहे. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४५०८ कोटी लीटर (१४५०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे.
तानसा तलाव गतवर्षी २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधी २४ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.१६ वाजता २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.
तानसा धरणाचे वैशिष्ट्य
तानसा धरण जगातील सर्वात लांबीच्या धरणांपैकी एक असून धरणाची लांबी २,७४३.२० मीटर आहे.
स्थापना वर्ष : १८९२
दैनंदिन पुरवठा : ४५५ द.ल.लि. प्रतिदिन
एकूण पाणीपुरवठ्यात योगदान : ११.०० टक्के
ठिकाण : मुंबईपासून १०६ किमी