तानसा तलाव ओव्हरफ्लो! २०० दिवस मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा, तरीही धरणातील पाण्याच्या पातळीवर लक्ष -गगराणी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. २४ जुलै रोजी सातही धरणात ५८.५८ टक्के अर्थात ८ लाख ४१ हजार ३८६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
तानसा तलाव ओव्हरफ्लो! २०० दिवस मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा, तरीही धरणातील पाण्याच्या पातळीवर लक्ष -गगराणी
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. २४ जुलै रोजी सातही धरणात ५८.५८ टक्के अर्थात ८ लाख ४१ हजार ३८६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. उपलब्ध पाणीसाठा पुढील २०० दिवस पुरेल इतका असल्याने आणखी काही दिवस धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत किती वाढ होते, यावर पालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. सातही धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला तर १० टक्के पाणीकपात रद्द करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशीनंतर तानसा तलाव दुपारी ४.१६ मिनिटांनी भरून ओसंडून वाहू लागला आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणातून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठ्याचे ऑक्टोबर महिन्यात वर्षभराचे नियोजन करण्यात येते. मात्र यंदा मे अखेरपर्यंत धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्याने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जून अखेरनंतर धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू झाली आणि सद्यस्थितीत सातही धरणात वरुणराजाची दमदार इनिंग सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाची अशीच बॅटिंग सुरू राहिली तर लवकरच १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात येईल, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

२४ जुलै रोजी पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा - ५७, ६७०

मोडक सागर - १,०,६,९८३

तानसा - १,३९,६५१

मध्य वैतरणा - १,०,२,५८५

भातसा - ४,०००,६६५

विहार - २५,७९८

तुळशी - ८,०४६

तीन वर्षांतील पाणीसाठा

(दशलक्ष लिटर)

२०२४ - ८,४१,३९६

२०२३ - ७,६४,७४१

२०२२ - १२,७६,५६३

तानसाची क्षमता १४५,०८० दशलक्ष लीटर

बुधवारी ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. हा तलाव गेल्या वर्षी २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता.

logo
marathi.freepressjournal.in