
मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर देशविदेशातील विविध प्रजातींचे मासे ठेवण्यात येणार आहेत. मरीन लाइन्स येथील कोस्टल रोडला साजेशी अशी आयकॉन इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार ३५० कोटी, तर केंद्र सरकारचे २०० कोटी असे एकूण ५५० कोटी रुपये खर्च करणार असून हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना व्यक्त केला. या इमारतीसाठी न्यूझीलंडच्या आर्किटेक्टने उत्तम डिझाईन दिली असून ती लवकरच फायनल करण्यात येईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मरीन लाइन्स येथील तारापोरवाला मत्स्यालयाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता पूर्ण इमारत पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर मत्स्यालय व अन्य मजल्यावर मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय असणार आहे. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाची कार्यालय असून वर्षांला एक कोटी २० लाख रुपये भाडे द्यावे लागते. राज्य सरकारच्या अखत्यारित तारापोरवाला मत्स्यालय असून नव्याने इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तारापोरवाला मत्स्यालयात मत्स्यालय बनवण्यासाठी दुबई, यूके, सिंगापूर व अमेरिका येथील कंपन्यांनी सादरीकरण केले असून लवकरच डिझाईन फायनल करण्यात येईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
तारापोरवाला मत्स्यालय एक एकर क्षेत्रावर असून इमारतीच्या तळ मजल्यावर मत्स्यालय सुरू झाल्यावर शंभर टक्के पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या नव्या मत्स्यालयामुळे पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
आयकॉन इमारत
-तळ मजल्यावरील मत्स्यालयात देशविदेशातील आकर्षक मासे
-वरील मजल्यावर मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय
-इमारतीच्या बांधकामासाठी ५५० कोटींचा खर्च अपेक्षित
-३५० कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार
-उर्वरित २०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू
-मरीन लाइन्स व कोस्टल रोडला साजेशी इमारत