

मुंबई : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधकांनी केलेल्या एका ऐतिहासिक क्लिनिकल ट्रायलमध्ये असे सिद्ध झाले आहे की, स्वस्त आणि सहज उपलब्ध किमोथेरपी औषध ‘कार्बोप्लॅटिन’ हे पारंपरिक उपचारांसोबत दिल्यास, स्त्रियांच्या ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या अत्यंत आक्रमक आणि उपचारास कठीण प्रकारात रुग्णांचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढते.
२०१० ते २०२० दरम्यान केलेल्या या दशकभराच्या मोठ्या अभ्यासातून जो जगातील पहिला निर्णायक ट्रायल मानला जातो ज्याने ‘टीएनबीसी’ मध्ये प्लॅटिनम आधारित किमोथेरपीवरील वाद संपवला. कार्बोप्लॅटिनचा समावेश केल्याने पाच वर्षांचे सर्व्हायव्हल रेट ६६.८% वरून ७४.४% पर्यंत वाढले, म्हणजेच ७.६ टक्के गुणांनी सुधारणा झाली. डॉक्टरांच्या मते ही सुधारणा ‘क्लिनिकली महत्त्वाची आणि उपचार पद्धतीत बदल घडवणारी’ आहे.
‘हा भारतीय अभ्यास स्तनाच्या कर्करोगावरील उपचारातील जुना प्रश्न संपवतो,’ असे टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. ‘आता आमच्याकडे स्पष्ट पुरावा आहे की स्वस्त आणि सोपी औषधे वापरून या आक्रमक कर्करोगावर मात करता येऊ शकते.’
हा अभ्यास २० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी ’ मध्ये प्रकाशित झाला आहे. हे अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजीचे अधिकृत जर्नल असून, २०२३ मध्ये त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर ४२ आहे. तज्ज्ञांच्या मते हा अभ्यास जागतिक उपचार मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल घडवू शकतो. टाटा मेमोरियल सेंटरचा प्लॅटिनम स्टडीचा यशस्वी निष्कर्ष हा भारतीय विज्ञानासाठी अभिमानाचा क्षण आहे,’ असे डॉ. गुप्ता म्हणाले. “यातून सिद्ध होते की भारतातील कमी खर्चिक पण उच्च दर्जाचे संशोधन जागतिक पातळीवरील उपचारपद्धती बदलू शकते.” डॉ. राजेंद्र ए. बडवे, टाटा मेमोरियलचे माजी संचालक म्हणाले, “हे संशोधन उपचारपद्धती ठरवणारे आहे. भारतात केलेले संशोधन जागतिक कर्करोग उपचारांवर प्रभाव टाकू शकते.”
अतिरिक्त दुष्परिणाम नाही
कार्बोप्लॅटिन हे पेटंटमुक्त आणि स्वस्त औषध असून, इतर कर्करोगांमध्ये वापरले जाते. या अभ्यासात ते प्रत्येक आठवड्याला कमी मात्रेत पॅक्लिटॅक्सेलसोबत दिले गेले. त्यानंतर नियमित किमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन उपचार झाले. विशेष म्हणजे, यामुळे अतिरिक्त दुष्परिणाम दिसून आले नाहीत.