

मुंबई : टाटा सन्सच्या संचालक मंडळाने मंगळवारी अध्यक्ष एन. चंद्रसेखरन यांच्या यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्तीबाबतचा निर्णय पुढे ढकलला, असे सूत्रांनी सांगितले. या घडामोडीमुळे कॉफीपासून कार आणि सॉफ्टवेअरपर्यंत व्यवसाय असलेल्या या समूहाच्या होल्डिंग कंपनीत मतभेद असल्याचे संकेत मिळतात.
येथील बैठकीत मंडळाने फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणाऱ्या सध्याच्या कार्यकाळानंतर चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवायचा की नाही, यावर कोणताही निर्णय घेतला नाही, असे सूत्रांनी नमूद केले.
बैठकीनंतर तत्काळ कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या नोएल टाटा त्यांनी समूहातील काही कंपन्यांतील तोट्यांबाबत चिंता व्यक्त केली. टाटा सन्सच्या नोंदणीबाबतही ते अनुकूल नसून, यासंदर्भात लिखित हमीची मागणी त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
चंद्रशेखरन यांना मंडळातील अनेक सदस्यांचा पाठिंबा असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. एका कंपनीतील तोटा संपूर्ण समूहाच्या कामगिरीवर किंवा अध्यक्षांच्या वर्षानुवर्षांच्या योगदानावर छाया टाकू नये, असे मत काही संचालकांनी व्यक्त केले. काही संचालकांनी मतदानाची मागणी केली; मात्र चंद्रशेखरन यांनी निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केली.
१९८७ मध्ये टाटा समूहात रुजू झालेल्या चंद्रशेखरन यांनी टप्प्याटप्प्याने प्रगती करत टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषवले आणि फेब्रुवारी २०१७ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.
समूहाचे पुनर्रचना आणि एकत्रीकरणाच्या टप्प्यातून यशस्वी मार्गदर्शन केल्याचे श्रेय चंद्रशेखरन यांना दिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहातील १५ सर्वात मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांचे उत्पन्न आणि नफा जवळपास दुप्पट झाले.
भारताची पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा उभारण्याच्या योजनांना गती देणे, तोट्यातील ‘एअर इंडिया’चे अधिग्रहण, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे झालेल्या व्यापक बदलांच्या काळात टीसीएसला सशक्तपणे मार्गदर्शन करणे आदी उच्च-जोखमीच्या धोरणात्मक निर्णयांनी त्यांचा कार्यकाळ ओळखला जातो.