टाटा सन्सचा प्रस्तावित IPO : मध्यस्थीसाठी मोदींना साद; शापूर मिस्त्रींचे पंतप्रधानांना दोनदा पत्र; टाटा सन्स-रिझर्व्ह बँक बैठकीचा तपशील जारी

‘टाटा सन्स’ची शेअर बाजारात नोंदणी करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष शापूर मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोनदा केली होती. या घटनेमुळे भारतातील या सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहातील मालकी, नियंत्रण आणि होल्डिंग कंपनीच्या भविष्यावरून सुरू असलेले तीव्र मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
टाटा सन्सचा प्रस्तावित IPO : मध्यस्थीसाठी मोदींना साद; शापूर मिस्त्रींचे पंतप्रधानांना दोनदा पत्र; टाटा सन्स-रिझर्व्ह बँक बैठकीचा तपशील जारी
टाटा सन्सचा प्रस्तावित IPO : मध्यस्थीसाठी मोदींना साद; शापूर मिस्त्रींचे पंतप्रधानांना दोनदा पत्र; टाटा सन्स-रिझर्व्ह बँक बैठकीचा तपशील जारी
Published on: 

मुंबई : ‘टाटा सन्स’ची शेअर बाजारात नोंदणी करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष शापूर मिस्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोनदा केली होती. या घटनेमुळे भारतातील या सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहातील मालकी, नियंत्रण आणि होल्डिंग कंपनीच्या भविष्यावरून सुरू असलेले तीव्र मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शापूरजी पालनजी समूहाने टाटा सन्सधील आपल्या १८.३७ टक्के हिश्श्याचे मूल्य (रोख रक्कम) उभे करण्यासाठी ऑक्टोबर २०२५ आणि जून २०२६ मध्ये पंतप्रधानांकडे हे साकडे घातले होते. दुसरीकडे, टाटा सन्सची मुख्य भागधारक असलेल्या ‘टाटा ट्रस्ट्स’ने कंपनीच्या सार्वजनिक समभाग विक्रीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

माहितीच्या अधिकाराखाली रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे ‘मिंट’ वृत्तपत्राने केलेल्या तपासात हा पत्रव्यवहार उघड झाला आहे. यातून टाटा समूहाचे वरिष्ठ अधिकारी आणि मध्यवर्ती बँक यांच्यात टाटा सन्सचा नियामक दर्जा व शेअर बाजारातील नोंदणीच्या बंधनाबाबत झालेल्या सखोल चर्चाही समोर आल्या आहेत.

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी कंपनीच्या शेअर बाजारातील नोंदणीच्या निर्णयाला तसेच अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याच्या टाटा सन्स संचालक मंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. मुख्य भागधारक संस्थेचे अध्यक्ष आणि स्वतः संचालक मंडळातील बहुसंख्य सदस्य यांच्यातील अनपेक्षित दरी समोर आली असून, मालकी, प्रशासन या मुद्द्यांवर थेट संघर्ष निर्माण झाला आहे.

पत्रव्यवहारात कोणती माहिती?

‘मिंट’च्या आरटीआय तपासणीनुसार, शापूर मिस्त्री यांनी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी मोदींना पत्र लिहून टाटा सन्सच्या नोंदणीबाबत सुरू असलेल्या दीर्घकालीन कोंडीत हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणाऱ्या दिवाळीवर मी न्यायाच्या आधारे तुमच्या हस्तक्षेपाची गरज असलेल्या टाटा सन्सच्या प्रदीर्घ कोंडीकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो, असे त्यांनी ‘श्रद्धा, आशा आणि धर्माचे दिवाळी पत्र - भेटीसाठी विनंती’ या विषयाखाली पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले होते.

मिस्त्री यांनी १२ जून २०२६ रोजी पंतप्रधानांना पुन्हा पत्र लिहिले. रिझर्व्ह बँकेने या दुसऱ्या पत्राचे मुखपृष्ठ ‘मिंट’ला उपलब्ध करून दिले, परंतु आरटीआय कायद्याच्या कलम ८(१)(डी) अंतर्गत व्यावसायिक गोपनीयतेचा हवाला देत त्यातील मजकूर गुप्त ठेवला. मिस्त्री यांच्या या विनंतीला पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिल्याचे किंवा त्यांना भेटीची वेळ दिल्याचे कोणतेही संकेत या कागदपत्रांतून मिळत नाहीत.

ऑक्टोबर २०२५ चे पत्र अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडे पाठवण्यात आले होते, ज्यावर विभागाने आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर शिरीष चंद्र मुर्मू आणि स्वामिनाथन जे. यांचे मत मागवले होते. जून २०२६ चा पत्रव्यवहारही याच विभागामार्फत रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आला होता.

सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा समूहाचे प्रतिनिधी यांच्यात १६ बैठका झाल्याची नोंद उत्तरात आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची नऊ वेळा भेट घेतली. कंपनीने ‘कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी’ नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी मार्च २०२४ मध्ये झालेल्या दोन बैठकांचा समावेश आहे. त्यांनी गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचीही मार्च २०२५ मध्ये भेट घेतली.

रतन टाटा यांच्या निधनाच्या दिवशी, म्हणजेच ९ ऑक्टोबर २०२४ रोजी नोएल टाटा यांनी शक्तिकांत दास यांची तर त्यानंतर २९ एप्रिल २०२६ रोजी मल्होत्रा यांची भेट घेतली. डेप्युटी गव्हर्नर मुर्मू यांनी या वर्षी टाटा समूहाचे कंपनी सचिव सुप्रकाश मुखोपाध्याय यांची चार वेळा भेट घेतली; यामध्ये टाटा सन्सने नियामक मार्गदर्शनाची विनंती केल्यानंतर आणि आरबीआयने नोंदणीबाबत ताजे पत्र पाठवण्यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)