

मुंबई : सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याच्या बांधिलकीचा भाग म्हणून मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील प्रतिष्ठित सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहाच्या पुनर्बांधणी व आधुनिकीकरणासाठी टाटा ट्रस्ट आणि मुंबई विद्यापीठामध्ये सामंजस्य करार झाला. ग्रेड-१ दर्जाच्या या वारसास्थळ इमारतीच्या जतनासाठी झालेला हा करार एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, तसेच अभाा नरैन लांबा असोसिएट्स या प्रतिष्ठित संवर्धन वास्तुशास्त्र फर्मच्या मुख्य वास्तुविशारद अभा नरैन लांबा उपस्थित हा करार करण्यात आला. या सभागृहाची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याच कंपनीकडे सोपवण्यात येणार आहे.
फोर्ट परिसर हा राजाबाई टॉवर, विद्यापीठ ग्रंथालय आणि सर कावासजी जहांगीर दीक्षांत सभागृह यासह प्रसिद्ध निओ-गॉथिक वास्तूंनी समृद्ध आहे. सर कावासजी जहांगीर यांच्या देणगीतून १८७४ मध्ये उभारण्यात आलेले सभागृह हे मुंबईच्या शैक्षणिक परंपरेचा आणि नागरी अभिमानाचा अविभाज्य भाग आहे.
महाराष्ट्र शासन, जमशेटजी टाटा ट्रस्ट आणि मुंबई महानगर प्रदेश वारसा संवर्धन समिती यांनी २००६ मध्ये संयुक्तरित्या या सभागृहाची पुनर्बांधणी केली. त्यावेळी अभा नरैन लांबा असोसिएट्स यांनी हे काम केले. या संवर्धन प्रकल्पाला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार मिळाल्याने या इमारतीचे महत्त्व आणखी वाढले.
दीक्षांत सभागृहाच्या पुनर्बांधणीसाठी टाटा ट्रस्टने दिलेल्या उदात्त योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठामार्फत आभार मानतो. त्यांच्या उदार योगदानामुळे ही वारसा इमारत जतन केली जाईल. जगभरातील विद्यार्थी, नागरिक आणि पर्यटकांसाठी ही इमारत महत्त्वपूर्ण आहे.
प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
ऐतिहासिक इमारतीचे संरक्षण म्हणजे मुंबईच्या शैक्षणिक आणि वास्तुकलात्मक वारशाचा मान राखणे. भावी पिढ्यांसाठी हा वारसा जतन करण्यासाठी, त्याची ऐतिहासिक भव्यता पुनर्संचयित करण्यासाठी आणि आधुनिक विद्यापीठाच्या गरजा पूर्ण करणारे एक चैतन्यशील स्थान राहण्याची खात्री करण्यासाठी मुंबई विद्यापीठासोबत सहयोग करण्यास आनंद होत असल्याचे टाटा ट्रस्टचे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले.