मुंबईला टीबीचा 'विळखा'! वर्षभरात ६३ हजार रुग्ण सापडले,दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू

वर्षभरात तब्बल २,१४७ रुग्णांना टीबीची लागण होऊन ते दगावल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
मुंबईला टीबीचा 'विळखा'! वर्षभरात ६३ हजार रुग्ण सापडले,दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू

गिरीश चित्रे/मुंबई

‘टीबीमुक्त मुंबई’ हे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले असले तरी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ ते आतापर्यंत मुंबईत तब्बल ६३ हजार ६४४ टीबीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच वर्षभरात तब्बल २,१४७ रुग्णांना टीबीची लागण होऊन ते दगावल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

मुंबई क्षयरोगमुक्तीसाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध स्तरावर उपक्रम राबवले जातात. २०२५ पर्यंत मुंबई टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले असले तरी मुंबईत टीबीच्या रुग्णांची वाढती नोंद धक्कादायक आहे. मुंबईत क्षयरुग्णाचे प्रमाण कमी झाले असले, तरी टीबी हा आजार प्रामुख्याने प्रौढांना होण्याचा धोका अधिक असतो. एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांना सक्रिय टीबी होण्याची शक्यता अधिक असते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने एचआयव्हीग्रस्तांमध्ये सक्रिय टीबीचा धोकाही जास्त असतो. तर कुपोषित लोकांना टीबी होण्याचा धोका तीनपट जास्त असतो, असे आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टरांनी सांगितले.

जानेवारी २०२३ ते आतापर्यंत तब्बल ६३ हजार ६४४ रुग्ण टीबीचे आढळले असून यापैकी १० हजार ९१३ रुग्णांनी टीबीवर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. क्षयरुग्णाच्या उपचाराचे फलित म्हणजे उपचार सुरू झाल्यानंतर औषध संवेदनशील क्षयरुग्णांसाठी सहा महिन्यांनंतर व फुफ्फुसेत्तर क्षयरुग्णांसाठी ९ महिन्यांनंतर तर औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांसाठी दोन वर्षांनंतर देण्यात येते.

वर्षभरात ५ कर्मचारी टीबीग्रस्त

टीबीच्या रुग्णांची विशेष काळजी घेताना आपल्याला कधी या रोगाची लागण होते, हे कर्मचाऱ्यांना कळतही नाही. रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टीबीची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण पाच कर्मचाऱ्यांना टीबीची लागण झाली असून त्यापैकी पाचही कर्मचाऱ्यांनी टीबीवर मात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in