

मुंबई : कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये टीबी तपासणीची कार्यपद्धती अधिक बळकट करण्यात आली आहे. कुपोषणामागील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बाल टीबीचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यासाठी राज्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या बालकांची टीबी तपासणी, निदान आणि उपचारासाठी मानक कार्यपद्धती, प्रशिक्षण, निदान सुविधा तसेच औषधांचा पुरवठा निश्चित करण्यात आला आहे. या कार्यपद्धतीनुसार बालकांची लक्षणे आणि टीबी रुग्णाच्या संपर्काचा इतिहास तपासला जातो. आवश्यकतेनुसार नमुना संकलन, सीबी-नॅट/ट्रूनॅट तपासणी आणि छातीचा एक्स-रे यांसारख्या निदान सुविधांशी बालकांना जोडण्यात आले आहे.
२०२१ ते जुलै २०२६ या कालावधीत पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल २९ हजार ८७५ बालकांपैकी २६ हजार ८५७ बालकांची टीबी तपासणी करण्यात आली. २०२६ मध्ये जुलैपर्यंत दाखल ३ हजार १७ बालकांपैकी २ हजार ८३५ बालकांची तपासणी करण्यात आली असून, हे प्रमाण ९४ टक्के आहे. तपासणीचे प्रमाण वाढत असताना टीबीचे निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
बाल टीबी प्रतिबंधासाठी नवीन उपक्रम
टीबीच्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या बालकांना टीबी प्रतिबंधात्मक उपचार देण्यासाठी घरगुती आणि एनआरसी संपर्क तपासणी बळकट करण्यात आली आहे. तसेच औषध-प्रतिरोधक आणि निदानास आव्हानात्मक बालरुग्णांसाठी बाल टीबी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. पोषण पुनर्वसन केंद्रांमधील टीबी तपासणी आणि निदानाची माहिती निक्षय पोर्टलशी जोडण्याचे काम सुरू आहे.