पुढील निवडणुकीत चहापाणी देणार नाही; नितीन गडकरी

अंधेरी येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात शनिवारी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
पुढील निवडणुकीत चहापाणी देणार नाही; नितीन गडकरी
Published on

“पुढील निवडणुकीत मी माझे पोस्टरही लावणार नाही. कोणाला चहापाणी देणार नाही. मतं द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ,” असे बिनधास्त वक्तव्य करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा खळबळ माजवली आहे.

अंधेरी येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात शनिवारी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, “मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे; मात्र मी कधी स्वत:चे कटआऊट लावत नाही व दुसऱ्याचेही लावत नाही. तरीदेखील मी निवडून नाही आलो का? आता तर पुढच्या निवडणुकीत मी ठरवले आहे. माझे नाव लोकांना माहिती आहे. त्यामुळे मी पोस्टरच लावणार नाही. कोणाला चहापाणीही देणार नाही. तुम्हाला मतं द्यायची तर द्या, नाहीतर नका देऊ.”

लोकच मायबाप!

गडकरी म्हणाले, “पुढील निवडणुकीत मी पोस्टर लावले नाही, चहापाणी दिले नाही. तरीही लोक मला मते देतील. कारण निवडणुकीत लोकच मायबाप असतात. लोकांनाही चांगले काम करणारे, चांगली माणसं हवी असतात. त्यामुळे मला लोक मते देतील. मी एवढ्या वर्षांपासून राजकारणात आहे; मात्र आतापर्यंत कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागतासाठी एकही माणूस येत नाही. मला निरोप द्यायलाही कुणी येत नाही. चांगले काम करत असाल तर त्याची आवश्यकताही नाही.”

...तर लोक खिशातून पैसे काढतील

लोकांना चांगली सेवा दिली तर लोक खिशातून पैसे देतील. त्यामुळे चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत गडकरींनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, “मुंबई-पुणे महामार्ग बांधला, तेव्हा टोलच्या नावाने ओरड सुरू झाली होती; मात्र त्यावर माघार न घेतल्याने आज तुमचा वेळ वाचतोय, वाहतूककोंडी कमी झाली, पेट्रोल डिझेलची बचत झाली ना. मग टोलचे पैसे द्या, असा मुद्दा मांडला. आता तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in