निवडणुकीची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर; अतिरिक्त कार्यभाराला शिक्षक संघटनेचा विरोध

मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने निवडणुकीच्या कामासाठी शिक्षण विभागातील शिक्षकांना कामाचे वाटप केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने निवडणुकीच्या कामासाठी शिक्षण विभागातील शिक्षकांना कामाचे वाटप केले आहे. शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (बीएलओ सुपरवायझर) म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत. तथापि, त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये. यासाठी निवडणुकीशी संबंधित कामे ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांना आणि शिक्षकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यभाराला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र विरोध केला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाली आहे. त्यासोबत मुंबई महापालिका प्रशासनही निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झाली आहे. यासाठी पालिकेने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांसाठीदेखील शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षकांच्या या नेमणुकाना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून थेट विरोध करण्यात आलेला आहे. शिक्षकांना अतिरिक्त काम करणे शक्य नाही. यामागची अनेक कारणे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच, पालिकेच्या शाळेत येणारे शिक्षक हे बरेचसे बाहेर राहत असून ते एक दोन तासाचा प्रवास करून कामावर हजार राहतात. त्यामुळे शिक्षकांना हे अतिरिक्त काम करणे अवघड आहे. तसेच अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होणार आहे, असे संघटनेचे मत आहे.

शिक्षक मानसिक तणावाखाली आहे. तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवू शकतो, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षक संघटनेच्या मुंबई शिक्षक कार्यवाही शिवनाथ दराडे यांनी केला आहे. निवडणुकीच्या अतिरिक्त कामाला आमचा विरोध असणारच आहे. यासाठी, लवकरच मुंबईतील सर्व शिक्षक यांच्या बाबतीत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू शकतात, अशी माहिती शिवनाथ दराडे यांनी दिली.

निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाने महापालिकेतील सर्वच खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक काम करावे लागते. शिक्षण खात्यात आजघडीला आठ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी फक्त दोन हजार शिक्षकांना सध्या निवडणूक मतदार याद्यांच्या कामासाठी नेमण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कार्यालयात बसून ऑनलाइन काम करावयाचे आहे. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आपली निवडणूक कामाची जबाबदारी पार पाडायची आहे. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.

- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

logo
marathi.freepressjournal.in