निवडणूक डयुटीच्या आदेशामुळे शिक्षक संतापले, काहींनी दिला ड्युटीला नकार

मुंबई मनपाकडून शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. कारण सध्या परीक्षेचा काळ असताना शिक्षकांच्या माथी वेगवेगळी कामे दिली जात आहेत.
निवडणूक डयुटीच्या आदेशामुळे शिक्षक संतापले, काहींनी दिला ड्युटीला नकार
(संग्रहित छायाचित्र)

रुचा कानोलकर/मुंबई : मुंबई मनपाकडून शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. कारण सध्या परीक्षेचा काळ असताना शिक्षकांच्या माथी वेगवेगळी कामे दिली जात आहेत. आता मुंबई मनपाने शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपल्याने त्यांचा संताप होत आहे.

मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाने बुथ स्तरावरील अधिकारी म्हणून शिक्षकांना कामाला लावले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. नुकतेच मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या वेळी शिक्षकांना नेमले होते.

सध्या परीक्षेचा मोसम आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बघण्याऐवजी शिक्षकांना वेगवेगळी कामे दिली जात आहेत. शिक्षकांच्या एकूण संख्येपैकी अर्धे शिक्षक हे निवडणूक कामाला पाठवले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये गोंधळ माजला आहे. आता परीक्षा कशा घ्यायच्या अशा प्रश्न पडला आहे.

मुलुंड विद्यामंदिरमधील १०० टक्के शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लावली आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्यावेळी १०० टक्के शिक्षकांना कामाला लावले होते. सध्या ११ फेब्रुवारी ते २९ एप्रिल दरम्यान शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी लावली आहे. आता शाळा कशी चालवायची असा प्रश्न शिक्षक व पालकांना पडला आहे.

शिक्षण हक्क कायद्याच्या कलम २५ व २७ नुसार, शिक्षकांना अशैक्षणिक कामाला जुंपू नये, असे म्हटले आहे. मात्र, कलम २७ नुसार, लोकसंख्या मोजणी, आपात्कालिन मदत, संसद, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिक्षकांची मदत घेता येते.

राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, निवडणूक कर्तव्ये नाकारण्याच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकारावर भर देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालांचा आणि अशा कामांमध्ये गुंतलेल्यांना भरपाईच्या रजेच्या तरतुदीचा उल्लेख करून या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत अधोरेखित केली. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि शैक्षणिक अधिकाऱ्यांसह अधिका-यांकडे चिंता व्यक्त करूनही, पाटील यांनी कारवाईचा अभाव आणि निर्णय घेणाऱ्यांवर येणाऱ्या दबावाबद्दल निराशा व्यक्त केली.

मात्र, काही शिक्षकांनी निवडणूक ड्युटी करण्यास नकार दिला आहे. एन. एम. जोशी निवडणूक कार्यालयाने सांगितले की, जे शिक्षक नकार देतील त्यांच्या घरी पोलीस पाठवले जातील तसेच त्यांना कामावरून निलंबित केले जातील. हे आम्ही स्वीकार करणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in