शिवसेनेत टीझर वॉर ;दसरा मेळाव्यावरून एकमेकांवर चिखलफेक

आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा हा आझाद मैदानावर असणार आहे
शिवसेनेत टीझर वॉर ;दसरा मेळाव्यावरून एकमेकांवर चिखलफेक

मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही शिवसेनेत दसरा मेळाव्यावरून वॉर सुरू आहे. आयोजनाच्या जागेचा तिढा सामोपचाराने सुटला असला तरी आता टीझरवरून वॉर सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर लाँच झाला आहे. काही जण इमान विकणारे, खोक्यांपायी विकले जाणारे असतात, पण मर्द विकला जात नाही. मर्द गद्दारी करत नाही. मर्दांचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर, दसरा मेळावा मर्दांचा मेळावा, असे या टीझरमध्ये म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी, बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. आमचा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे. वारसा हा खऱ्या विचारांचा असायला हवा सडक्या मनोवृत्तीचा नको. ओरिजनल विचार शिवसेनाप्रमुखांचे आमच्याकडे आहेत. आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा हा आझाद मैदानावर असणार आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेत दोन तट पडले आणि दसरा मेळाव्याच्या आयोजनावरून वाद सुरू झाला. दरवर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित होतो. तिथे नेमक्या कोणत्या शिवसेनेला परवानगी द्यायची, यावरून वाद होत होता. गेल्या वर्षीही हा वाद झाला, यावर्षीही झाला. पण, यावर्षी शिंदे गटाकडून सामोपचाराची भूमिका घेतली गेली व आझाद मैदान येथे मेळावा आयोजित करण्यात आला. आता ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर लाँच झाला आहे. त्यात शिंदे गटावर कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. ‘काही जण पळून जाणारे असतात. रात्रीच्या अंधारात स्वार्थासाठी इमान विकणारे असतात. खोक्यांपायी विकले जाणारे असतात, पण मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही. मर्दाचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर, दसरा मेळावा मर्दांचा मेळावा असे’ या टीझरमध्ये म्हटले आहे.

त्यावर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ‘हलक्या मनाचे, आतल्या गाठीचे आणि शिवसेनेपासून दूर गेलेले नेतृत्व आज आमच्यावर टीका करत आहे. आपणच हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलेले आहे. शिवसेना भाजपच्या युतीतून पळून जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती करता. त्यामुळे आपणच पळपुटे आहात. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना स्थापन होताना ज्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षाशी लढा दिला, त्यात कित्येक लोकांचे बळी गेले त्यांच्याशीच आपण आघाडी करता. बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जाताना लाज वाटली नाही. ते रडत राऊत कायम रडत राहतात, त्या दसऱ्या मेळाव्यात तुम्ही सावरकरांच्या बाजूने बोलणार आहात, हिंदुत्वाच्या बाजूने बोलणार आहात की काँग्रेसच्या विरोधात बोलणार आहात, याचं पहिलं उत्तर द्या. बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा हा आझाद मैदानावर असणार आहे,’ असे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in