महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे वापरण्यात येणार

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे वापरण्यात येणार
Published on

बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रोत्साहित केलेल्या नव उद्यमींच्या पहिल्या तुकडीची नावीण्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आता वापरासाठी उपलब्ध झाली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही उपकरणे रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी मदत करणार असून, नव उद्यमींनादेखील त्यातून पाठबळ मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त अशा वस्तू, उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणाऱ्या नव उद्योजकांना मुंबई महापालिकेने प्रोत्साहन दिले आहे. यासाठी महानगरपालिकेने स्माईल कॉन्सिल बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून नव उद्योजकांनी संशोधित केलेल्या वस्तू, उपकरणे, तंत्रज्ञानाचा अवलंब महानगरपालिकेच्या विभागां-मध्ये करणे, त्यातून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे आणि त्यासोबतच या नव उद्योजकांना भरारी घेण्यासाठी सहाय्य करणे, हा स्माईल उपक्रमाचा हेतू आहे. या संकल्पनेनुसार प्रोत्साहन देण्यात आलेली पाच नव उद्यमींची पहिली तुकडी ऑगस्ट २०२१मध्ये सुरू करण्यात आली होती. या तुकडीने संशोधित केलेली उत्पादने व तंत्रज्ञान आता बृहन्मुंबई महानगर-पालिकेमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध झाले आहे. कस्तुरबा रुग्णालयासह प्रमुख रुग्णालयात उपलब्ध होणार असल्याने आरोग्यसेवांचे निर्णय अधिक चोखपणे घेता येतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in