
मुंबई : हवामान विभागाने पुढील काही दिवस प्रचंड उकाडा व उष्णतेचे असतील, असा इशारा दिला आहे. तसेच मुंबईसह आसपासच्या शहरांत ९ आणि १० मार्चला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दिवशी हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईमध्ये ८ मार्च वगळता ७ ते १० मार्चदरम्यान तापमानाचा पारा चढा राहण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातही उष्ण आणि दमट हवामान राहील. पालघरमध्ये मात्र हवामान कोरडे राहणार असून ९ आणि १० तारखेला तापमानाचा पारा चढणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमाल तापमानात वाढ होणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्यानंतर मार्चमध्ये तापमानात आणखी ५ अंशाची भर पडू शकते. त्यामुळे कमाल तापमान ३७ ते ३८ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभर मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
गेले काही दिवस राज्यभर वाऱ्यांची दिशा बदलत आहे, अरबी समुद्रामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा चढा राहू शकतो. महाराष्ट्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तापमानातील ही वाढ १३ मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.