मुंबई सखोल स्वच्छता पॅटर्न राज्यात अंमलबजावणी; मंदिर स्वच्छता मोहीम, परिसर स्वच्छतेसाठी हातभार -मुख्यमंत्री

मंदिर स्वच्छतेमुळे आजुबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ होण्यासाठी मदत होते.
मुंबई सखोल स्वच्छता पॅटर्न राज्यात अंमलबजावणी; मंदिर स्वच्छता मोहीम, परिसर स्वच्छतेसाठी हातभार -मुख्यमंत्री

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर व परिसर स्वच्छता अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतही मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून यामुळे स्वच्छता मोहिमेत प्रत्येक घटकाचा हातभार लागत आहे. मुंबईत ३ डिसेंबरपासून संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियान राबवण्यात येत आहे. आता राज्यातील इतर शहरांत सखोल स्वच्छता पॅटर्न टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुर्ला नेहरू नगर शिवसृष्टी श्री गणेश मंदिर परिसरासह विविध ठिकाणी स्वच्छता अभियानात शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, त्यावेळी ते बोलत होते.

मंदिर स्वच्छतेमुळे आजुबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ होण्यासाठी मदत होते. एकाचवेळी तीन ते चार विभागातील मनुष्यबळ हे परिसर स्वच्छतेसाठी एकवटल्याने या मोहिमेला ठिकठिकाणी बळ मिळत आहे. मुंबईतील सखोल स्वच्छता मोहीम पॅटर्नची राज्यातील विविध शहरांमध्ये अंमलबजावणी होऊ लागली आहे. स्वच्छतेची ही मोहीम राज्यात विस्तारत असताना, त्यात एकट्या प्रशासनाचा सहभाग नव्हे, तर इतरही घटकांचा सहभाग मिळत आहे. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक व सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक आदींसह समाजातील सर्वच वर्गाचा सहभाग लाभतो आहे. स्वच्छतेच्या अभियानाचा सकारात्मक परिणाम हा मुंबईतील वायू प्रदूषण कमी झाले आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

कुर्ला परिसरातील शिवसृष्टी गणेश मंदीर (कुर्ला नेहरू नगर) आणि नंदिकेश्वर मंदिर (कामगार नगर) याठिकाणी मंदिर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी मंदिर परिसरांमध्ये कचरा काढून तसेच लादी स्वच्छ करतानाच हाय प्रेशर जेट पाइपद्वारे पाणी फवारुन मंदिर परिसरांचे रस्ते, पदपथ यांची स्वच्छता करण्यात आली. स्थानिक परिसरातील नागरिकांनीही या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. त्यामध्ये महिला तसेच लहान मुलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कुर्ला परिसरातील शाळकरी मुलेही उत्साहाने स्वच्छता अभियानात सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in