
मुंबई: मुंबईत ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या सासूला टेम्पोमध्ये जिवंत जाळून ठार मारले आणि या घटनेत स्वतःही भाजल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला, अशी माहिती नवघर पोलिसांनी बुधवारी दिली.
मुलुंड परिसरात सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर मृत व्यक्ती कृष्णा दाजी अष्टंकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सासू बाबी दाजी उसारे ह्या ७२ वर्षांच्या होत्या.
अष्टंकर हा टेम्पोचालक होता आणि त्याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी त्याला सोडून बोरीवली येथे एका रुग्णाची देखभाल करण्यासाठी राहायला गेली होती. त्याचा मुलगा आणि विवाहित मुलगीही वेगळी राहत होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जावयाचाही मृत्यू
प्राथमिक चौकशीनुसार, अष्टंकर हा दारूच्या व्यसनाने त्रस्त होता आणि एकटेपणामुळे संतापलेला होता. त्याला असे वाटत होते की त्याची सासूच त्याच्या पत्नीला वेगळे राहण्यासाठी प्रवृत्त करत आहे. पीडित महिलेच्या मुलाच्या माहितीनुसार, अष्टंकरने तिला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी सोमवारी टेम्पोमधून दवाखान्यात नेण्याची ऑफर दिली. मात्र, त्याने टेम्पोचे मागील शटर बंद करून तिला जड वस्तूने मारहाण केली आणि नंतर जिवंत पेटवले. तथापि, टेम्पोच्या लहानशा जागेत तोही आगीत अडकला आणि गंभीर भाजल्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर अग्निशमन दलासह पोलीस तिथे पोहोचले. शटर तोडून दोघांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.