

अभिषेक पाठक / मुंबई:
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. दिवा आणि भिवंडी दरम्यान उल्हास नदीवर बांधलेला तात्पुरता स्टीलचा पूल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. हा पूल मुख्यत्वे अवजड यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य आणि कामगारांची ने-आण करण्यासाठी बांधण्यात आला होता. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे नदीपात्रात पाणी वाढल्याने हा पूल वाहून गेला असून, यामुळे प्रकल्पाच्या कामात काही महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
दहा फूट रुंदीचा पूल वाहून गेल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. परिणामी, नवीन तात्पुरता पूल उभारल्यानंतरच मुख्य पुलाचे काम पुन्हा सुरू होऊ शकणार आहे, ज्याचा थेट परिणाम प्रकल्पाच्या गतीवर झाला आहे. सध्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे.
पर्यायी मार्ग तयार करण्याचे प्रयत्न सुरू
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, कारण पूल वाहून गेला तेव्हा तिथे कोणीही कामगार उपस्थित नव्हते. प्रकल्पाच्या मुख्य पुलाचे काम सुरू असून, आता पुन्हा तात्पुरता मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.