
मुंबई : मुंबई पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाऊंटन आणि वरळी येथे दोन नवीन रोबो-पार्किंग सुविधा उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मागील अर्थसंकल्पात याची केवळ अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, इलेक्ट्रोमेकॅनिकल रोबोटिक पार्किंग सुविधांची उभारणी आणि देखभालीसंदर्भातील अनेक अडचणींना सामोरे जात असताना पालिकेने केलेल्या भरघोस तरतुदीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रोबोटिक यंत्रणा आणि प्लॅटफॉर्मने सुसज्ज असलेले पार्किंग स्थळ म्हणजे रोबोटिक पार्किंग. या पार्किंगची ही रचना बहुस्तरीय असून याठिकाणी एकाचवेळेस अनेक वाहने उभी करता येऊ शकतात. फ्लोरा फाउंटन सुविधेमध्ये एका वेळी १९४ वाहने, तर वरळीतील सुविधेत एका ठरावीक वेळेत ६४० चारचाकी आणि ११२ दुचाकी सामावून घेऊ शकतात, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
...म्हणून सुविधा उभारण्याचा पर्याय
मुंबईत दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मोकळ्या जागा आणि उद्यानांच्या जागेवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. सध्या मुंबईत मोकळ्या जागांची कमतरता आहे, त्यामुळे उद्यानांचे आरक्षण बदलून त्यांना पार्किंग स्थळ बनवणे अन्यायकारक ठरेल. त्याच वेळी, वाहनांची घनता वाढत आहे आणि जर आम्हाला पार्किंगचे उपाय सापडले नाहीत तर रस्ते बेकायदेशीर पार्किंगने व्यापले जातील. म्हणून अशा प्रकारच्या सुविधा उभारणे हाच एक पर्याय असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.