आरडीएक्सचा वापरुन मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट ?

आरडीएक्सचा वापरुन मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट ?

हरयाणात पकडलेल्या बब्बर खालसा खलिस्तानी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन समोर आले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबीही पुढे येत आहेत. पाकिस्तानात लपून घातपात घडवणारा दहशतवादी हरविंदरसिंह रिंडा नांदेडमधील स्लीपर सेल कार्यरत करण्याच्या तयारीत होता. त्यानेच नांदेडमध्ये आरडीएक्सचा मोठा साठा पाठवला होता. या आरडीएक्सचा वापर करून मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलीस सतर्क झाले आहेत.

हरयाणाच्या करनाल जिल्ह्यातील बस्तारातून ४ दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. साधारण पाच ते सहा महिन्यांपूर्वी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. हा अलर्ट हरविंदरसिंह रिंडा याच्या बाबतीतच असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पाठवण्यात आले; मात्र त्याची पुसटशीही कल्पना महाराष्ट्र एटीएसला मिळू शकली नाही. या आरडीएक्सचा वापर मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी तर होणार नव्हता ना? अशा शंका आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, दहशतवादी हरविंदरसिंह रिंडानेच नांदेडमधील लोकांकडून जवळपास २०० कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

रिंडा कोण आहे?

हरविंदर सिंग उर्फ रिंडा हा पंजाबमधील तरनतारनचा रहिवासी आहे. वयाच्या ११ व्या वर्षी तो आपल्या कुटुंबासह नांदेड येथे स्थलांतरित झाला होता. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी कौटुंबिक वादातून त्याने प्रथम आपल्या एका नातेवाईकाची हत्या केली. त्यानंतर तो नांदेडमध्ये वसुलीचे काम करू लागला आणि यादरम्यान त्याने दोन जणांची हत्या केली होती.

बब्बर खालसा पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे बब्बर खालसा इंटरनॅशनल ही खलिस्तानवादी संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. स्वतंत्र खलिस्तान हा या संघटनेचा अजेंडा आहे. कॅनडा, जर्मनी, यूके आणि भारतात या संघटनेची पाळंमुळं आहेत. जथ्थेदार तलविंदरसिंग परमार आणि जथ्थेदार सुखदेव सिंग बब्बर यांनी या संघटनेची स्थापना केली. २३ जून १९८५ या दिवशी एअर इंडियाच्या माँट्रियल- लंडन- दिल्ली- मुंबई या कनिष्क नावाच्या विमानात या संघटनेने भीषण स्फोट घडवला. या स्फोटात विमानातले तब्बल ३२९ प्रवासी ठार झाले होते. तेव्हापासून ही संघटना जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली.

Related Stories

No stories found.