टेस्लाचे भारतात आगमन पुण्यात कार्यालयासाठी जागा घेतली

सवलती न मिळाल्याने कंपनीने आपला प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता
टेस्लाचे भारतात आगमन  पुण्यात कार्यालयासाठी जागा घेतली

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीत गणना होणारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यात माहीर असलेले उद्योजक एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात येत आहे. कंपनी पुणे शहरात आपले कार्यालय सुरू करत आहे. भारतात ही कंपनी टेस्ला इंडिया मोटर अॅन्ड एनर्जी कंपनी या नावाने व्यवसाय करणार आहे. कंपनी आपल्या कार्यालयासाठी पुण्यातील विमाननगर येथे जागा घेत आहे. याचा अर्थ लवकरच ही कंपनी भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे.

कंपनीने पुण्यातील टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ५८५० चौ.फूट जागा दरमहा ११.६५ लाख रुपये भाडे दराने भाडेतत्वावर घेतली आहे. या जागेत कंपनीला कार्यालयासाठी एकूण ३१५० चौ.फूट चटर्इ क्षेत्र उपलब्ध होणार आहे. २६ जुलै रोजी याबाबतचा व्यवहार पूर्ण झाला असून कंपनीने एकूण ३४.९५ लाख रुपये मुद्रांक शुल्क देखील भरले आहे. सध्या कंपनीने ६० महिने म्हणजेच पाच वर्षांसाठी भाडेकरार केला असून दरवर्षी भाडे दरात ५ टक्के वाढ होणार आहे. जागेत तीन कॉन्फरन्स रुम व ४१ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार टेस्ला कंपनीला भारतात वार्षिक ५ लाख इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा कारखाना सुरू करायचा आहे. भारतातूनच कंपनी आपल्या वाहनांची अन्य देशांमध्ये निर्यात करणार आहे. कंपनीने २०२२ साली भारतात आपला तळ निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सरकारकडून फारशा सवलती न मिळाल्याने कंपनीने आपला प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in