भुयारी मेट्रोची दादर स्थानकापर्यंत चाचणी; पहिल्या टप्यातील मेट्रो धावण्याची तारीख लवकरच जाहीर होणार

मुंबईतील पहिल्या भूमिगत कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या चाचणी गतवर्षीपासून सुरू आहेत
भुयारी मेट्रोची दादर स्थानकापर्यंत चाचणी; पहिल्या टप्यातील मेट्रो धावण्याची तारीख लवकरच जाहीर होणार

मुंबई : मुंबईतील पहिल्या भूमिगत कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या चाचणी गतवर्षीपासून सुरू आहेत. पहिल्या टप्यातील मेट्रो मार्गावर चाचणी सुरू असतानाच नुकतीच दुसऱ्या टप्यातील दादर स्थानकापर्यंत मेट्रो-३ चालविण्यात आली. भुयारी मेट्रोचा सिप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू करण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने मेट्रो-३ च्या आराखड्याला २०११ मध्ये मंजुरी दिली. प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगी प्राप्त झाल्यानंतर २०१६ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. या मेट्रो-३ मार्गाची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके आहेत. या प्रकल्पाच्या कारशेडचा वाद सुरू असतानाही या प्रकल्पाची विविध कामे सुरू होती.

मेट्रो-३ ची चाचणी ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली. तेव्हापासून मेट्रोच्या विविध चाचण्या सुरू आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील सिप्झ आणि बीकेसी दरम्यान गाड्यांची चाचणी करण्यात येत होती. परंतु दुसऱ्या टप्प्यातील काही स्थानकांची कामे वेगाने पूर्ण होत असल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दादर स्थानकापर्यंत चाचणी करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे एका गाडीची चाचणी मंगळवारी करण्यात आली. सिद्धिविनायक स्थानकापर्यंत मेट्रोची कामे झाली असल्याने लवकरच या स्थानकापर्यंत मेट्रो चालविण्यात येणार आहे.

डेडलाइन पुन्हा चुकणार

मेट्रो-३ मार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांनी मेट्रोचे काम रखडले आणि प्रकल्पाच्या खर्चातही वाढ झाली. सिप्झ आणि बीकेसीदरम्यानच्या कॉरिडॉरचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत आणि बीकेसी आणि कुलाबादरम्यानचा जून २०२४ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न होता. २०२४ च्या जानेवारी महिन्यात पहिला टप्पा सुरू करण्यात येणार होता. मात्र ही डेडलाइन चुकली असून आता जून महिन्यात मेट्रो धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा

मेट्रो प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र गरजेचे असते. त्यानुसार मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नसल्याने आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येऊ शकलेला नाही. सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच मेट्रो ३ प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in